फसवणुकीच्या विविध घटना
पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या या गुन्ह्यांमध्ये सायबर चोरट्यांनी नागरिकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आहेत:
मनी लाँड्रींग आणि चौकशीचे नाटक: एका ज्येष्ठ नागरिकास 'मनी लाँड्रींग'च्या खोट्या चौकशीची भीती दाखवून त्यांना थेट ६३ लाख ४० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास भाग पाडले गेले.
दत्तक की बाळाची विक्री? तपासाला वेगळं वळण, नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर
advertisement
फेक ॲप आणि स्टॉक ट्रेडिंग: वारजे परिसरात एका ५८ वर्षीय व्यक्तीस 'घानी सिक्युरिटी' नावाचे बनावट ॲप इन्स्टॉल करायला लावून स्टॉक ट्रेडिंगमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. यातून त्यांची मोठी ५४ लाख ८१ हजार रुपयांची लूट झाली.
फेडेक्स कुरिअर घोटाळा: कोथरूड येथे एका ५१ वर्षीय व्यक्तीला 'आपले पार्सल कस्टममध्ये अडकले आहे' आणि त्यात अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यातील २५ लाखाहून अधिक रक्कम वळवण्यात आली.
प्रीपेड टास्क फ्रॉडचा कहर: खडक, चतु:शृंगी, बाणेर आणि चंदननगर परिसरामध्ये प्रीपेड टास्क नावाच्या नवीन फसवणुकीच्या प्रकारात अनेक लोक अडकले. टेलिग्रामद्वारे हॉटेल रिव्ह्यू, लाईक किंवा छोटी कामे पूर्ण करण्याच्या नावाखाली मोठी कमाई मिळवून देण्याचे लालच दाखवत नागरिकांकडून टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. या टास्क फ्रॉडमध्ये अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले, ज्यात बाणेर आणि चतुःशृंगी येथील नागरिकांकडून अनुक्रमे २५ लाख आणि १४ लाख ६९ हजार उकळले गेले.
शेअर ट्रेडिंग आणि इतर फसवणूक: उत्तमनगर, नांदेड सिटी आणि वानवडी येथे शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली. तसेच, वानवडी येथील एका ज्येष्ठ महिलेने कोणतीही माहिती, ओटीपी किंवा तपशील न देताही त्यांच्या डेबिट कार्डमधून ९ लाख ७८ हजार काढले गेले.
पोलिसांकडून तातडीचे आवाहन
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्यामुळे पुणे पोलीस अधिक गंभीर झाले असून, सर्व प्रकरणांचा तपास विविध पथके करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अज्ञात किंवा अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये. तसेच कमी वेळेत भरघोस परतावा देणाऱ्या कोणत्याही योजनांवर किंवा ॲपवर विश्वास ठेवू नये, अशी सक्त सूचना पोलिसांनी केली आहे.
