अरविंद बाबुलालजी लोढा (वय ५५, रा. प्राधिकरण, निगडी) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. शहरातील एका नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 73 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात समोर आलं की, फसवणुकीच्या रकमेपैकी 30 लाख 84 हजार रुपये टप्प्याटप्प्याने (दहा व्यवहारांद्वारे) निगडीतील अरविंद लोढा यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते.
advertisement
सायबर चोरटे फसवणुकीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात न घेता, 'चांगल्या परताव्याचे' आमिष दाखवून किंवा इतर प्रलोभने देऊन नागरिकांच्या बँक खात्याचा वापर करतात. लोढा हे याच पद्धतीचे काम करत होते. याप्रकरणी तपास करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पुण्यात सध्या तपास यंत्रणांकडून कारवाईची भीती, शेअर बाजारात बंपर परतावा, तसेच 'वर्क फ्रॉम होम' टास्कसारखी आमिषे दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अशा फसवणुकीचे किमान दोन ते तीन गुन्हे रोज दाखल होत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या आमिषांना बळी पडू नका आणि तुमच्या बँक खात्याचा वापर इतरांना करू देऊ नका.
