पुणे : पुण्यातील रस्त्यांवर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांमुळे निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दरम्यान येरवड्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रविवारी मध्यरात्री येरवड्यातील सादल बाबा दर्गा परिसरात एका भरधाव कारने धुमाकूळ घातला त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर घडणाऱ्या अशा घटनांमुळे पुणेकरांनी पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
advertisement
येरवड्यातील सादल बाबा दर्गा परिसरात काल मध्यरात्री भरधाव कारने प्रचंड थरार माजवला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याकडच्या एका दुकानात घुसली. या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. काल रात्री उशिरा एक कार प्रचंड वेगात येरवडा परिसरातून जात होती. चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वेगावर नियंत्रण न राहिल्याने कार अचानक वळणावरून घसरत थेट दुकानात आदळली. अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल
या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी मध्यरात्र असल्याने दुकानात किंवा रस्त्यावर कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, दुकानाचे मोठे नुकसान झाले असून कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकावर कठोर कारवाईची मागणी
येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. चालकावर बेदरकारपणे वाहन चालवणे यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पुणे शहरात वारंवार घडणाऱ्या ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’च्या घटनांमुळे पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांकडून अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :
