सासवड विभागाचा हायवेवर सापळा
पहिली मोठी कारवाई १७ डिसेंबर रोजी सातारा-पुणे महामार्गावर सारोळा (ता. भोर) येथे करण्यात आली. गोव्याहून येणाऱ्या एका संशयित ट्रकमध्ये 'औषधे' असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, सासवड विभागाचे निरीक्षक संभाजी बर्गे आणि त्यांच्या पथकाने ट्रकची सखोल झडती घेतली. यावेळी औषधांच्या बॉक्सच्या मागे लपवून ठेवलेल्या १८६ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. हा सर्व मद्यसाठा गोवा राज्य निर्मित असून महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. या प्रकरणी ट्रक चालक संपत लक्ष्मण गावडे (रा. आंबेगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या घरातूनही जादा साठा जप्त करण्यात आला आहे.
advertisement
उरुळी कांचनमध्ये कारसह सूत्रधार जेरबंद
दुसरी कारवाई १३ डिसेंबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे करण्यात आली. 'के' विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या पथकाने एका आलिशान कारचा पाठलाग करून त्यात गोवा बनावटीच्या १३८ बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत केवळ चालकालाच नाही, तर तपासाची चक्रे वेगाने फिरवून मद्य पुरवठादार राजू केकान आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हनुमंत रोकडे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय आंबेगाव बुद्रुक परिसरात छापा टाकून समीर राऊत यालाही अटक करण्यात आली आहे.
प्रशासनाचा इशारा
पुणे एक्साईजचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये मिळून ट्रक, कार, मोबाईल आणि महागडी विदेशी दारू असा एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागाने दिला आहे.
