गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 20 जणांची नावं
पुणे शहर पोलिसांनी शहरातील विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांची आणि उमेदवारांची कसून चौकशी केल्यानंतर एक विशेष यादी तयार केली आहे. ही यादी थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पाठवण्यात आली असून, यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 20 जणांची नावं समाविष्ट असल्याची माहिती आहे. ज्या उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांचे नातेसंबंध कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांशी आहेत, अशा व्यक्तींना पक्षांनी तिकीट दिल्याने पोलिसांनी घारीसारखी नजर या उमेदवारांवर ठेवली आहे.
advertisement
आंदेकर ते मारणे...
या यादीमध्ये प्रामुख्याने आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यासह सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच, कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे आणि गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर यांचीही नावे या यादीत असल्याचे समजते. या महिला उमेदवारांनी पुण्यातील विविध प्रभागांतून आपली उमेदवारी जाहीर केली असून, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे निवडणुकीच्या काळात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चोवीस तास लक्ष ठेवणार
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी एक विशेष 'निरीक्षण समिती' (Screening Committee) स्थापन केली आहे. ही समिती केवळ यादी तयार करण्यापुरती मर्यादित नसून, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे उमेदवार किंवा त्यांचे समर्थक कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करत नाहीत ना, यावर चोवीस तास लक्ष ठेवणार आहे. मतदारांवर दबाव टाकणे, पैशांचा वापर करणे किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करणे यांसारख्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी ही समिती तैनात करण्यात आली आहे.
