पिंपरी - चिंचवड: : हिंजवडी आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. आयटी हब हिंजवडी येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव आलेल्या एका बसचे नियंत्रण सुटल्याने ती थेट फुटपाथवर चढली. या अपघातात फुटपाथवरून चालणाऱ्या दोन लहानग्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पंचरत्न चौकात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसने पादचारी नागरिकांना जोरदार धडक दिली आहे. अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ०६) अशी आहेत. तर या अपघातात प्रिया देवा प्रसाद (वय १८) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून अविनाश चव्हाण या पादचारी व्यक्तीसह बसमधील काही प्रवासीही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
advertisement
गर्दी हटवण्याचे काम सुरू
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड रस्त्यावर हा अपघात घडला. आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारी ही बस होती. पंचरत्न चौकातून नागरिक नेहमीप्रमाणे पायी जात होते. त्यावेळी कंपनीचे कर्मचारी वाहतूक बस भरधाव वेगाने चौकातून जात होती. त्यावेळी बसवरील चालकाचा ताबा सुटला आणि पादचऱ्यांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांवर नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, हे अपघात कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहचले असून गर्दी हटवण्याचे काम सुरू आहे.
अपघात थांबणार कधी थांबणार?
अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वाकड आणि हिंजवडी वाहतूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत केली. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा या दुर्घटनेमुळे समोर आला आहे. नागरिकांकडून अपघात थांबणार कधी असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
