नेमकी घटना काय?
तक्रारदार ज्येष्ठ महिला कल्याणीनगरमधील एका सोसायटीत राहतात. शुक्रवारी (३० जानेवारी) सायंकाळी त्या काही कामासाठी बाहेर गेल्या होत्या. पावणेआठच्या सुमारास त्या रिक्षाने आपल्या परिसरात परतल्या. रिक्षातून उतरल्यानंतर त्या चालकाला पैसे देत असतानाच, पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांना जोराचा धक्का दिला. महिला काही समजण्याच्या आतच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि दुचाकीवरून पसार झाला.
advertisement
आठवड्यात दुसरी घटना
कल्याणीनगर भागात अशाच प्रकारे गेल्या आठवड्यातही एका पादचारी महिलेचे दागिने चोरट्यांनी पळवले होते. एकाच आठवड्यात दोन घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून तपासणी करत असून चोरट्यांचा माग काढला जात आहे.
चोरट्यांवर 'मकोका'ची टांगती तलवार
शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीच कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. अशा गुन्हेगारांविरुद्ध 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. मात्र, पोलिसांच्या या इशाऱ्यानंतरही चोरट्यांची हिंमत कायम असल्याचे या घटनेवरून दिसून येते.
