महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली घसरला आहे. राज्यातल्या काही ठिकाणी थंडीची लाटही आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. अनेक मंडळी कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी उघड्यावर शेकोटी करत असतात. ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर मंडळी शेकोटी पेटवत असतात. पण आता जर कोणी शहरामध्ये शेकोटी पेटवली तर त्यांच्यावर महानगरपालिका कारवाई करणार आहे.
advertisement
होय, अगदी बरोबर वाचलंत तुम्ही... थंडीपासून थोडा दिलासा मिळावा म्हणून जर तुम्ही उघड्यावर शेकोटी कराल तर तुमच्यावर पुणे महानगर पालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. पुण्यामध्ये जर कोणीही उघड्यावर शेकोटी पेटवलीत तर त्यावर पुणे महापालिकेच्यावतीने कारवाई केली जाणार आहे. उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा, कोळसा जाळला जातो. यामधून हवा प्रदुषित होते. याला आळा बसावा म्हणून शेकोटी पेटवल्यास घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल असे आदेश महापालिकेने दिले आहे.
यासंबंधितची माहिती पुणे महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागाने माध्यमांना दिली आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या आदेशात पुणे शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरामध्ये रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवू नये असे आदेश देण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळतात. यामधून निर्माण होणाऱ्या धुरामुळे पुणे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होतात, तर याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतो.
शेकोट्या पेटवल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते. त्यातून नागरिकांना श्वसनासाठी परिणाम होतो. ज्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे पुणे महापालिकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. शहरातल्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. महानगर पालिकेने घेतलेल्या निर्णयाचा पुणेकर किती पालन करतायत ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
