आठ दिवसांपासून हालचाल सुरूच
बावधन परिसरातील रहिवाशांनी तात्काळ बिबट्याचे फोटो आणि व्हिडीओ वन विभागाला पाठवले. वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी केली असता, त्यांना बिबट्याच्या पंजाचे ठसेही आढळले. यामुळे बिबट्याचे वास्तव्य याच परिसरात असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. चांदणी चौक परिसरामध्ये पसरलेल्या ५०० एकर वनक्षेत्रात बिबट्याचे कायमस्वरूपी वास्तव्य असल्याचे वन अधिकारी आणि नागरिकांचे म्हणणे आहे.
advertisement
वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर मनोज बारबोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील टेकड्यांवर मोठे जंगल आहे आणि यापूर्वीही या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला आहे. एका नागरिकाने बिबट्याचे राम नदीत पाणी पितानाचे फोटो पाठवल्यानंतर टीमने तेथे तपासणी केली असता, पायाचे ठसे सापडले.
औंधचाच बिबट्या बावधनमध्ये?
तज्ज्ञांच्या मते, औंधमध्ये दिसलेला बिबट्याच नॅशनल सोसायटी मार्गे बावधन टेकडीच्या दिशेने आला असावा. गेल्या आठ दिवसांपासून तो याच परिसरातील दाट झाडीत लपून बसला असून, रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर भटकत आहे. रविवारी मध्यरात्री माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी हॉटेल डी-पॅलेसच्या मागे दिसलेल्या बिबट्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले होते.
ट्रॅप कॅमेऱ्यांचा सापळा, नागरिकांना आवाहन
बिबट्याच्या वारंवार दर्शनामुळे बावधनसह औंध, पाषाण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाचे पथक, तसेच रेस्क्यू टीमने या भागात ट्रॅप कॅमेरे (Trap Cameras) बसवून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
रेस्क्यू संस्थेच्या संस्थापिका नेहा पंचमिया यांनी नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, बिबट्या दिसल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही विश्वसनीय माहिती मिळाल्यास तात्काळ वन विभागाच्या १९२६ किंवा रेस्क्यूच्या ९१७२५१११०० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
