ही परिस्थिती पाहिल्यानंतर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन स्वतः मैदानात उतरले. नागरिकांशी संवाद साधत त्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मनुष्यबळ कमी आहे आणि सर्व कारभार सध्या मॅन्युअली सुरू आहे. त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. मात्र, नागरिकांनी सहकार्य करावे, जेणेकरून तुम्हाला वारंवार न्यायालय किंवा पोलीस स्टेशनला जावे लागू नये, असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
या लोकअदालतीचे आयोजन पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलीस यांच्या वतीने करण्यात आले होते. 10 ते 13 सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दंड सवलतीत भरण्याची संधी देण्यात आली. मात्र, शुक्रवारी येरवडा येथे अनपेक्षित गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला. आज शनिवारी झालेल्या शिवाजीनगर लोकअदालतीत परिस्थिती पुन्हा तशीच होती. त्यामुळे न्यायाधीश महाजन यांनी स्वतः सूत्रे हाती घेऊन नागरिकांना आश्वासन दिले की, या योजनेचा सर्वांना जास्तीत जास्त फायदा मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्यांनी सांगितले की, ज्यांचे चलन रजिस्टर झालेले नाही त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा नागरिकांना टोकन देण्यात आले असून, पुढील एका महिन्यात त्यांचे रजिस्ट्रेशन केले जाईल. याशिवाय, जर उच्च न्यायालय किंवा सरकारकडून परवानगी मिळाली, तर ऑनलाइन दंड भरण्याची सुविधाही सुरू होऊ शकते. मात्र, परवानगी न मिळाल्यास न्यायालयात येऊन दंड भरावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांतच तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, नागरिकांना तेवढाच फायदा झाला आहे, अशी माहितीही न्यायाधीश महाजन यांनी दिली.