नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, मूळचा दौंड तालुक्यातील केडगावचा रहिवासी असलेला आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०) आणि त्याचा मित्र मनोहर अण्णा रणसिंग हे दोघे कामावर निघाले होते. शनिवारी (१७ जानेवारी) सकाळी सहाच्या सुमारास हडपसरकडून वाघोलीच्या दिशेने ते कामावर जात होते. वाटेत सिरम कंपनीसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते पुन्हा मुख्य रस्त्यावर आले. मात्र, तेव्हाच मांजरीच्या दिशेने येणाऱ्या मिनी बसने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
advertisement
ही धडक इतकी भयानक होती की, यात आदित्य शेळकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचा मित्र मनोहर रणसिंग याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत मिनी बस चालक माऊली अंभोरे (वय २३, रा. आव्हाळवाडी) याला ताब्यात घेतले आहे. ऐन विशीत असलेल्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने केडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, बस चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत आहे का, याची चौकशी केली जात आहे.
