रिंग रोडच्या भोवतालच्या 117 गावांचा विकास
रिंग रोडच्या भोवतालच्या 117 गावांचा विकास लवकरच सुरू होणार आहे. या गावांमध्ये शाळा, टाउनशिप, ट्रक टर्मिनल, लॉजिस्टिक पार्क आणि ट्रॉमा केअरसारख्या अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेत. हवेली, मुळशी, भोर, वेल्हे आणि पुरंदर या तालुक्यांतील या गावांचा विकास MSRDCकडे सोपवण्यात आला असून, सुमारे 668 चौ.किमी क्षेत्राचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले.
advertisement
Pune News: नवले पुलावरील अपघातानंतर प्रशासनाला जाग, दुर्घटना टाळण्यासाठी प्लॅन ठरला
गावांच्या महाविकासाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
रिंग रोड प्रकल्पाअंतर्गत गावांचा विकास कसा करता येईल, हे समजून घेण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. गावांतील उपलब्ध सुविधा, बांधकामाची स्थिती आणि जमीन वापर याची माहिती गोळा करण्यात आली. खेळाची मैदाने, खुल्या जागा आणि भविष्यात होणाऱ्या सुविधा यावरही लक्ष ठेवले गेले. या मोकळ्या जागांचा वापर करून नव्या विकासाचे नियोजन तयार केले जाणार आहे.
भविष्यात रिंग रोडभोवतीच्या गावांचा विकास झाल्यानंतर लोकसंख्या वाढेल, त्यामुळे पाणीपुरवठा, पाण्याच्या टाक्या, क्रीडांगणे, स्मशानभूमी, मलनिस्सारण प्रकल्प, पर्यटन सुविधा आणि अग्निशामक दलासाठी जागा राखणे आवश्यक आहे. याशिवाय नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी सांडपाणी प्रकल्प उभारून अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी दोन ग्रोथ सेंटर विकसित केले जाणार आहेत.
गावांमध्ये एज्युकेशन आणि इंडस्ट्रियल हबचे नियोजन
रिंग रोडभोवती 117 गावांमध्ये उद्योग कंपन्या असलेल्या ठिकाणी इंडस्ट्रियल हब विकसित केला जाणार आहे. बहुतांश गावे महामार्गालगत असल्यामुळे विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांसाठी आवश्यक जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच उद्योगांसाठी लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांमुळे आता 18, 24 आणि 30 मीटर रुंदीचे मोठे रस्ते तयार करण्याचे नियोजन आहे. पुढील 20 वर्षांतील भविष्यातील गरजांचा विचार करून DP तयार केला जाणार आहे.






