पुणे: पुण्यात माणसुकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोसायटीतीलच तिघांनी मिळून गेल्या सहा-सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सोसायटीचे 'क्लब हाऊसच्या स्वच्छतागृहाचा वापर या नराधमांनी या कृत्यासाठी केल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
advertisement
समोोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती स्पेशल चाईल्ड आहे. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपींनी तिला गाठून सोसायटीच्याच क्लब हाऊसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. हा प्रकार केवळ एकदाच घडला नाही तर गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून आरोपी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचे शोषण करत होते. आरोपींच्या धमकावण्यामुळे आणि भीतीपोटी ही मुलीने या संदर्भात कोणालाही सांगितले नाही.
पालकांना मोठा धक्का
काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागल्याने तिच्या पालकांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. आपल्याच राहत्या सोसायटीत आपली मुलगी सुरक्षित नाही, या जाणीवेने पालकांना मोठा धक्का बसला आहे.
तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
भारती विद्यापीठ पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पोक्सो (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील सोसायट्यांच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
