महापालिकेच्या नियोजनानुसार पावसाळ्यापूर्वी काही महत्त्वाचे पूल पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. घोरपडी येथील रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल तसेच सनसिटी कर्वेनगर येथील नदीवरील पूल यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी साइटवरील तांत्रिक अडचणींमुळे कामांमध्ये विलंब होत असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.
advertisement
पे अँड पार्क सेवा
रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याने महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर शहरातील पाच रस्त्यांवर पे अँड पार्क योजना सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या योजनेमुळे रस्त्यांवरील अव्यवस्थित पार्किंगवर नियंत्रण ठेवता येईल आणि वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शहर विकास आराखड्यातील चार बोगदा प्रकल्पांपैकी पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) आणि सिंहगड रोड (हिंगणे खुर्द) ते तळजाई चौक या दोन बोगदा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. तसेच बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणीय परवानग्या घेऊन लवकरच काम सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
यंदा हे पूल तयार होणार
सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये शास्त्रीनगर उड्डाण पूल, बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाण पूल आणि सेनापती बापट चौक उड्डाण पूल यांचा समावेश असून हे प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच वासवानी पूल आणि विश्रांतवाडी उड्डाण पूल पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट 2026 पर्यंत कालावधी लागू शकतो.
या पुलांना 2027 चा मुहूर्त
याशिवाय पुढील वर्षात मुंढवा चौकातील उड्डाण पूल, शिवणे–नांदेड सिटी नदीवरील पूल, चांदणी चौक ते भूगाव उड्डाण पूल व रस्ता रुंदीकरण प्रकल्प, साखर संकुल रेल्वे उड्डाण पूल तसेच खडकी येथील रेल्वे भुयारी मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचेही नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासोबत काही महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपुलांचे एकत्रित नियोजन करण्यात येत आहे. कोथरूड बस डेपो चौक, आंबेडकर चौक (वारजे) आणि दांडेकर पूल चौक येथे मेट्रोसोबतच उड्डाण पुलांची उभारणी करण्याची योजना आखण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.






