बनावट चावीचा वापर करून डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २६ जानेवारीच्या मध्यरात्री विश्रांतवाडी परिसरातील 'केकाण पेट्रोल पंपा'वर झाली. चोरट्याने कार्यालयात प्रवेश करून अत्यंत चालाखीने बनावट चावीच्या साहाय्याने लॉकर उघडले. लॉकरमध्ये ठेवलेली सव्वासहा लाखांची रोकड घेऊन चोरटा पसार झाला. विशेष म्हणजे, कार्यालयाची तोडफोड न करता केवळ बनावट चावीचा वापर केल्यामुळे हा प्रकार कोणाच्याही चटकन लक्षात आला नाही.
advertisement
सकाळी उघड झाला प्रकार
२७ जानेवारी रोजी सकाळी जेव्हा कर्मचारी कामावर आले, तेव्हा त्यांना लॉकरमधील रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिंगरेनगर येथील एका ४३ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी पंपाच्या परिसरातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. चोरट्याने बनावट चावीचा वापर केल्यामुळे, हा गुन्हा पंपावरील सध्याच्या किंवा जुन्या कर्मचाऱ्याने अथवा माहितीतील व्यक्तीने केला असावा का, या दिशेनेही तपास सुरू आहे.
पुण्यातील वर्दळीच्या विमानतळ रस्त्यावर अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
