निवडणुका गल्लीबोळातील स्थानिक प्रश्नांसाठी
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली परखड मत व्यक्त केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागोपाठ झाल्यामुळे लोकांमध्ये मतदानाबाबत कंटाळा असू शकतो पण या निवडणुका गल्लीबोळातील स्थानिक प्रश्नांसाठी आहे, असं प्रवीण तरडेंनी म्हटलंय. मात्र, हे युद्ध कोणामध्ये सुरू आहे आणि जखमा कोणाला होत आहेत, हे कळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मतदारांनी उत्साहाने बाहेर पडणं गरजेचं असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
advertisement
गुन्हेगारांची उमेदवारी मान्य नाही
निवडणुकीतील उमेदवारीबाबत बोलताना तरडे यांनी राजकीय पक्षांना आरसा दाखवला. "कोणताही सुज्ञ माणूस गुन्हेगारांना दिलेली उमेदवारी मान्य करणार नाही," असं स्पष्ट करत त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकारणापासून लांब ठेवण्याचं आवाहन केलं. निवडणूक लढवणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असला, तरी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही, याचा गांभीर्याने विचार 'जबाबदार' पक्षांनी केला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मी कधीही गुन्हेगारांचे समर्थन करणार नाही
दरम्यान, गुन्हेगारी विषयावर चित्रपट बनवणं आणि प्रत्यक्ष आयुष्यात गुन्हेगारांना पाठिंबा देणं यात मोठी तफावत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. "मी गुन्हेगारीवर एखादा उत्कृष्ट सिनेमा बनवू शकतो, पण मी कधीही गुन्हेगारांचे समर्थन करणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राजकीय पक्षांनी स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना संधी दिली, तरच खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल, असा विश्वास प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला आहे.
