पहाटे रस्ते झाडणारे हात आज विजयाचा गुलाल उधळत आहेत: अमर आवळे यांची ही यशोगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे आई आणि वडील दोघेही गेल्या २५ वर्षांपासून पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. दररोज पहाटे उठून पुणेकरांचे रस्ते स्वच्छ करणाऱ्या या दाम्पत्याने आपल्या मुलाला उच्चशिक्षित केले. आज ज्या महापालिकेत आई-वडील सफाईचे काम करतात, त्याच महापालिकेच्या सभागृहात त्यांचा मुलगा 'नगरसेवक' म्हणून मानाने प्रवेश करणार आहे.
advertisement
धीरज घाटेंनी मारली मिठी : साने गुरुजी नगर परिसरातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर अमर आवळे यांनी विजयाचा जल्लोष करत असताना भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची भेट घेतली. विजयाचा गुलाल उधळताच अमर आवळे जेव्हा धीरज घाटे यांच्या गळ्यात पडले, तेव्हा दोघांनाही भावना अनावर झाल्या. एका सामान्य कार्यकर्त्याचा हा विजय भाजपच्या ११९ जागांच्या विजयातील सर्वात भावनिक क्षण ठरला.
आई-वडील आजही ड्युटीवर: अमर आवळे नगरसेवक म्हणून निवडून आले असले तरी, त्यांच्या पालकांमधील साधेपणा आणि कामाप्रती असलेली निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही. मुलगा महापालिकेत धोरणात्मक निर्णय घेणार असला, तरी त्यांचे आई-वडील आजही आपली सफाई कामगाराची सेवा बजावत आहेत. "माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे हे फळ आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे," अशी भावना अमर यांनी व्यक्त केली.
