पुणे : 'वेळ आली होती पण काळ आला नव्हता' या म्हणीचा प्रत्यय पुण्यातील एक घटनेत आला आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने गळफास घेतला होता. पण, वेळी पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बेडरूमचा दरवाजा तोडून गळफास घेतलेल्या व्यक्तीला वाचवलं. पुणे पोलीस दलातील मार्शलच्या प्रसंगावधान कृत्यामुळे सदरील व्यक्तीचा जीव वाचला. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात मिठानगर परिसरात ही घटना घडली. साजिद तांबोळी असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचं नाव आहे. सदरील व्यक्ती साजिद तांबोळी आणि त्याची पत्नी यास्मिन तांबोळी या दाम्पत्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून कडाक्याचं भांडणं झालं होतं. या वादातून साजिद तांबोळी हे बेडरूममध्ये गेले आणि दार लावून घेतलं. बराचं वेळ झाल्यामुळे साजिद बाहेर येईना. त्यामुळे यास्मिन तांबोळी यांनी पोलिसांनी फोन करून माहिती दिली.
दिवसाच्या ड्युटीवर असताना कोंढवा मार्शलचे पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार निकम आणि पीसी ४४१ राक्षे यांना मिठा नगर परिसरातून एका घरगुती भांडणाचा तातडीचा कॉल प्राप्त झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून हे दोन्ही अंमलदार तातडीने घटनास्थळी पोहोचले.
दरवाजा तोडून वाचवलं
तिथे पोहोचल्यावर त्यांना कॉलर यास्मिन तांबोळी यांनी सांगितलं की, त्यांचे पती साजिद तांबोळी यांनी वादातून स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतलं आहे. पोलिसांनी बेडरूमच्या दरवाजाबाहेरून साजिद यांना अनेकदा आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी विपरीत घडल्याची शंका आल्याने निकम आणि राक्षे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बेडरूमचा दरवाजा तोडला.
दरवाजा तोडल्यानंतर साजिद तांबोळी यांनी फॅनला गळफास घेतला असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तातडीने साजिद तांबोळी यांना खाली उतरवलं. त्यांना लगेच सीपीआर दिला. त्यामुळे तांबोळी यांचा जीव थोडक्यात वाचला. शुद्धीवर आल्यानंतर तांबोळी यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. पोलीस अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य वेळी दिलेल्या 'सीपीआर'मुळे (CPR) एका कुटुंबाचा आधार वाचला असून पुणे पोलीस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
