दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची भावनिक WhatsApp स्टेटस टाकून पोलिस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले आहेत . मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार निखिल रनदिवे यांची बदली यवतहून शिक्रापूर येथे झाली होती. मात्र, बदली आदेश असूनही पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्यांना कार्यमुक्त करण्यास विलंब केल्याचा आरोप रनदिवे यांनी आपल्या चिट्ठीत केला आहे. या विलंबामुळे आणि वरिष्ठांच्या त्रासामुळेच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
advertisement
सहकाऱ्यांमध्ये खळबळ
बेपत्ता होण्यापूर्वी रनदिवे यांनी WhatsApp वर भावनिक संदेश पोस्ट केला. या संदेशात त्यांनी मुलीच्या पहिल्या वाढदिवशी तिच्यापासून दूर जात असल्याचे दुःख व्यक्त केले असून, आपल्यावरील मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या या स्टेटसनंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
माझी प्रिय दिदी,
आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये घेऊन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली एक वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईविलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा...
घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी हालचाल सुरू झाली आहे. हवालदार रनदिवे यांच्या शोधासाठी विशेष पथक गठित करण्यात आले असून, यवत ते शिक्रापूर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, वरिष्ठांकडून छळ झाल्याच्या गंभीर आरोपांमुळे पोलिस विभागातही मोठी चर्चा सुरू असून, घटनेचा तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे. हवालदार रणदिवे यांचा शोध लागावा आणि प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
