वृद्धाश्रमात वास्तव्यास असताना डल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सेवानिवृत्त मेजर सध्या कोंढवा परिसरातील एका वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत. वाढत्या वयामुळे त्यांच्या देखभालीसाठी राज शहा या केअर टेकरची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मेजरच्या विश्वासाचा फायदा घेत राज शहा आणि त्याच्या साथीदाराने, सुप्रीतसिंह कंडारिया (वय ३९, रा. कोथरूड) याने त्यांचा विश्वासघात करण्याचे कट कारस्थान रचले.
advertisement
बनावट स्वाक्षरी आणि बँकिंग फ्रॉड
केअर टेकरने मेजरच्या संमतीशिवाय त्यांचे काही कोरे चेक चोरले. त्यानंतर मेजरची हुबेहूब बनावट स्वाक्षरी करून कॅम्प परिसरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेतून तब्बल १ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये आपल्या खात्यात वळवून घेतले. ही मोठी रक्कम खात्यातून गायब झाल्याचे लक्षात येताच सेवानिवृत्त मेजर यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
लष्कर पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी राज शहा आणि सुप्रीतसिंह कंडारिया यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रक्षकच भक्षक बनल्याच्या या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलीस सध्या या व्यवहाराची तांत्रिक कागदपत्रे तपासत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
