वाहन खरेदीचा हंगाम दिवाळीत नेहमीच जोमात असतो, मात्र यंदा पसंती क्रमांकांच्या नोंदणीचा विक्रम मोडला आहे. चारचाकी वाहनांच्या किमती वस्तू व सेवा कर (GST) कपातीमुळे कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी क्षमता वाढली आहे. परिणामी, पुणेकरांनी मोठ्या संख्येने नव्या कार खरेदी केल्या आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिथे 15 हजारांहून अधिक वाहने विकली गेली होती, तिथे दिवाळी पाडव्याच्या दिवशी तब्बल 13,387 नवीन वाहनांची नोंद झाली.
advertisement
Pune News : वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली; महावितरणने घेतला मोठा निर्णय
आरटीओच्या माहितीनुसार, चारचाकी वाहनधारकांचा पसंती क्रमांक घेण्याचा कल सर्वाधिक आहे. मागील काही वर्षांत जिथे सरासरी 600 ते 700 अर्ज येत होते, तिथे यंदा दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे, एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज येत असल्याने लिलाव प्रक्रियेतही चुरस वाढली आहे. काही वाहनधारकांनी आपल्या लकी नंबरसाठी हजारो रुपये अधिक मोजले आहेत.
पुणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले, पसंती क्रमांकासाठी 1200 हून अधिक जणांनी अर्ज केला असून, या माध्यमातून कार्यालयाला सुमारे 2.2 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुण्यात नेहमीच खास क्रमांकांसाठी मागणी असते, मात्र यंदा दिवाळीमुळे ती विक्रमी पातळीवर गेली आहे.
दिवाळीच्या काळात वाहन विक्रेत्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी नवीन वाहन खरेदीसोबत शुभ मुहूर्तावर नोंदणीसाठी पसंती क्रमांक निश्चित केला. काही ग्राहकांसाठी हे फक्त क्रमांक नसून, त्यांचे भाग्य अंक असल्याचे सांगितले जाते.
एकूणच, दिवाळीच्या झगमगाटात पुणेकरांचा वाहन खरेदी आणि पसंती क्रमांकासाठीचा उत्साह पुन्हा एकदा दिसून आला आहे. या वाढलेल्या मागणीमुळे वाहन विक्रेते आणि आरटीओ दोघांनाही उत्पन्नात चांगली भर पडली असून, पुण्यातील वाहन बाजाराला नवसंजीवनी मिळाल्याचे मानले जात आहे.