Pune News : वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली; महावितरणने घेतला मोठा निर्णय
Last Updated:
Electricity Workers : महावितरणच्या वतीने राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पुणे : राज्यातील वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. या सर्व कारणांमुळे या कामगारांची दिवाळी आनंदात साजरी होईल असे आश्वासन महावितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार यांनी दिले.
भारतीय मजदूर संघाशी संलग्न राज्य वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले. संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीस सचिन मेंगाळे, किरण मिलगीर, शर्मीला पाटील, अमर लोहार, निखिल टेकवडे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी सांगितले की पुनर्रचनेमुळे कोणत्याही कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले जाणार नाही. उलट 10 टक्के अधिक भरती केली जाईल. कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील. सर्व कामगारांची यादी राज्यातील विभागांना पाठवली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना तशी सूचना देण्यात आली आहे.
advertisement
राज्यात ज्यांच्या मेहनतीमुळे दिवाळीचा प्रकाश घराघरात पोहोचतो त्याच कामगारांवर अन्याय होता कामा नये अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.
दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना चालू आणि थकीत वेतन, फरक रक्कम आणि बोनस देण्याचे निर्देश संचालक पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच जर कोणता कंत्राटदार हे आदेश पाळत नसेल तर त्याच्यावर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे असेही आदेश पवार यांनी दिले. त्यामुळे वीज कंत्राटी कामगारांची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने उजळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 7:17 AM IST