2025 मध्ये इन्स्टामार्टच्या वेगवान सेवांनी अनेक विक्रम मोडले. यंदा सर्वात जलद आयफोन डिलिव्हरीचा विक्रम महाराष्ट्रातील पुण्यात नोंदवण्यात आला. पुण्यात iPhone 17 केवळ 3 मिनिटांत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात आला. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अहमदाबादचा नंबर लागला, जिथे आयफोनची डिलिव्हरी फक्त 3.5 मिनिटांत झाली. केवळ वेगच नाही, तर खरेदीच्या क्षमतेतही पुणेकर आघाडीवर आहेत. शहरातील एका ग्राहकाने वर्षभरात इन्स्टामार्टवरून तब्बल 13 लाख रुपयांची खरेदी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
स्विगी सुरुवातीला केवळ किराणा मालाच्या जलद डिलिव्हरीसाठी ओळखले जाणारे इन्स्टामार्ट आता स्मार्टफोन, अत्याधुनिक गॅजेट्स आणि अगदी सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू काही मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे.
हैदराबादमध्ये टेक खरेदीचा विक्रम
या वर्षातील सर्वात मोठी टेक खरेदी हैदराबादमध्ये झाली आहे. इन्स्टामार्टवर देशातील आतापर्यंतचा सर्वात महाग टेक कार्ट हैदराबादमधील एका ग्राहकाने तयार केला. या ग्राहकाने तब्बल 4.3 लाख खर्च करून iPhone 17 Pro चे तीन मोबाईल एकाच ऑर्डरमध्ये मागवले. विशेष म्हणजे इतक्या महागड्या आणि उच्च-मूल्याच्या वस्तू असूनही डिलिव्हरी अत्यंत वेगाने पार पडली. यावरून ग्राहक महागड्या उत्पादनांच्या डिलिव्हरीबाबत क्विक कॉमर्सवर विश्वास ठेवत आहेत.
नोएडाचा टेक-एक्स्पो कार्ट
नोएडामधील एका ग्राहकाचा कार्टही सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या कार्टमध्ये 2.69 लाख किमतीच्या रोबोट व्हॅक्युम क्लिनर, ब्लूटूथ स्पीकर्स, पोर्टेबल SSD, नॉइज-कॅन्सलिंग हेडफोन्स आणि प्रीमियम इअरबड्स यांचा समावेश होता. यामुळे इन्स्टामार्टला आता केवळ किराणा सेवेसाठी नव्हे, तर सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ‘वन-स्टॉप डेस्टिनेशन’ म्हणून पाहिले जात आहे.
टियर-2 आणि टियर-3 शहरांची मोठी भूमिका
स्विगी इन्स्टामार्टने आयोजित केलेल्या ‘क्विक इंडिया मूव्हमेंट’ सेलमुळे ग्राहकांना जवळपास 500 कोटींची बचत झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या एकूण खरेदीपैकी सुमारे एक तृतीयांश ऑर्डर्स टियर-2 आणि टियर-3 शहरांमधून आल्या. ज्यामुळे क्विक कॉमर्सचा विस्तार मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही.
एका ग्राहकाचा वर्षभरात 22 लाखांहून अधिक खर्च
टेक खरेदी ही केवळ एखाद-दोन वेळची चैन राहिलेली नाही, हेही या अहवालातून समोर आले आहे. 2025 मध्ये इन्स्टामार्टवरील देशातील सर्वाधिक खर्च करणाऱ्या नियमित ग्राहकाने वर्षभरात 22 लाखांपेक्षा जास्त रकमेची खरेदी केली. या ग्राहकाच्या कार्टमध्ये स्मार्टफोन, एअर फ्रायर, हेडफोन्स, SSD ड्राइव्ह्स, 24 कॅरेट सोन्याची नाणी यांसारख्या महाग वस्तूंसोबतच दूध, अंडी, आईस्क्रीम, फळे, टिक टॅक्ससारख्या अगदी सामान्य वस्तूंचाही समावेश होता. एवढेच नव्हे, तर कॉलेजची पाठ्यपुस्तकेसुद्धा या ग्राहकाने इन्स्टामार्टवरून मागवली होती.
