पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने थरकाप उडालाय. पिंपरखेड गावात भरदिवसा 13 वर्षाच्या मुलावर हल्ला करत त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. ही हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली.बोबे या 13 वर्षांच्या मुलावर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याने रोहन याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पिंपरखेड परिसर पुन्हा हादरला आहे.
advertisement
पिंपरखेड येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. यावेळी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि ऊसाच्या शेतात ओढत नेले. घरासमोर खेळणारा मुलगा दिसत नाही म्हणून आई-वडिलांनी तात्काळ शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला. त्यावेळी ऊसाच्या शेतात रोहन मृतावस्थेत मिळाला. काही क्षणात घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांकडून तीव्र संताप
एका महिन्यात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांनी वनविभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे. संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी उलटी करत वाहन पेटवून दिली. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस कृती कार्यक्रम राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, संतप्त गावकऱ्यांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
हे ही वाचा :
