सुरक्षा वाढवण्याचे उद्दिष्ट
स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांतून दररोज हजारो प्रवासी राज्याच्या विविध भागांत प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे या ठिकाणी शिस्त राखणे, अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखणे, तसेच चोरी आणि इतर गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे हे एक आव्हान होते.
एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता बसस्थानकांवर ये-जा करणाऱ्या मार्गांच्या दोन्ही बाजूंना, तिकीट खिडकी परिसरामध्ये, तसेच स्थानकाच्या मध्यवर्ती भागात खास सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
advertisement
या व्यवस्थेमुळे संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, तातडीच्या परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे आणि विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे अधिक सुलभ होणार आहे.
आधुनिकीकरण आणि भविष्यातील योजना
एसटी महामंडळाने बसस्थानकांचे आधुनिकीकरण, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधा वाढवण्याचा संकल्प केला आहे. विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी स्पष्ट केले की, पुणे, स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या तिन्ही बसस्थानकांवर सुरक्षारक्षकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून ते दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत.
पुढील टप्प्यात, नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करणे आणि महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची योजना आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी दूर होऊन त्यांची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढेल, असे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.
