गाडी क्र. 12219 आणि 12220 लोकमान्य टिळक टर्मिनल सिकंदराबाद दुरंतो एक्सप्रेसमध्ये पूर्वी एक प्रथम वातानुकूलित, चार वातानुकूलित द्वितीय, दहा वातानुकूलित तृतीय, एक द्वितीय आसन आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर कार आणि एक पँट्री कार असे एकूण 18 डबे होते. या रचनेत स्लिपर कोचचा समावेश नसल्यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी ही गाडी परवडणारी नव्हती. अनेक वेळा या संदर्भात प्रवाशांनी मागणी केली होती. शेवटी रेल्वे प्रशासनाने ती मागणी मान्य करून दोन शयनयान डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
या बदलामुळे आता दुरंतो एक्सप्रेसमध्ये एकूण 20 डबे असतील. स्लिपर कोचच्या समावेशामुळे सामान्य प्रवाशांनाही कमी तिकिट दरात जलद प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत वातानुकूलित डब्यांमुळे या गाडीचा प्रवास तुलनेने महागडा ठरत होता. मात्र, आता स्लिपर कोचमुळे जास्तीत जास्त प्रवासी या गाडीचा लाभ घेऊ शकतील. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हा बदल 16 सप्टेंबरपासून लागू होणार आहे, तर या कोचचे बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.
दुरंतो एक्सप्रेस ही मुंबई-पुणे-सोलापूर मार्गे सिकंदराबादला जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची गाडी मानली जाते. या गाडीला नेहमीच मोठी गर्दी असते. गाडीचा वेग, वेळेवर धावणारी सेवा आणि प्रवासाचा आराम या कारणांमुळे प्रवाशांना दुरंतो एक्सप्रेस पसंत आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी केलेला हा बदल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पुणे, सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक प्रवाशांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार, नोकरी-व्यवसायानिमित्ताने प्रवास करणारे आणि कौटुंबिक प्रवास करणारे लोक आता अधिक स्वस्तात आणि सोयीस्कर पद्धतीने दुरंतो एक्सप्रेसने प्रवास करू शकतील. दोन स्लिपर कोचच्या समावेशामुळे प्रवाशांचा ताण कमी होईल आणि गर्दीचा भारही काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा आहे.
रेल्वे प्रशासनाने नेहमीच प्रवाशांच्या मागणीनुसार बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळीही स्लिपर कोच वाढवल्याने सामान्य प्रवाशांची मोठी सोय होणार असून दुरंतो एक्सप्रेसचा प्रवास अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या गाडीचे आरक्षण वाढेल आणि प्रवाशांना अधिक स्वस्तात जलद व सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल.