मनीषाचा विवाह फेब्रुवारी 2021 मध्ये रामचंद्र बुरटे याच्याशी प्रेमविवाह पद्धतीने झाला होता. लग्नानंतर काही महिने सर्वकाही सुरळीत होतं, मात्र त्यानंतर सासरच्या लोकांचं वर्तन पूर्णपणे बदललं. रामचंद्र आणि त्याची आई सुमती यांनी मनीषाकडे सातत्याने पैशांची आणि हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली. कधी घरखर्चासाठी तर कधी गाडीचे हप्ते भरण्यासाठी ५० हजार रुपये रोख रकमेची मागणी केली जात असे. तसेच, 'तुझ्या माहेरच्यांनी लग्नात काहीच दिले नाही,' असे म्हणून तिला सतत टोमणे मारले जात होते.
advertisement
मनीषा एका टाटा एजन्सीमध्ये नोकरी करत असताना, नोव्हेंबर २०२४ मध्ये तिच्यावर नोकरी सोडण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला. 'दुसरी नोकरी कर आणि जास्त पैसे घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस,' अशी सक्ती सासरचे लोक करत होते. या छळाला कंटाळून ती माहेरी गेली असतानाही सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरूच राहिली. मनीषाला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती. तसेच 'पैसे न आणल्यास तुला घराबाहेर काढू आणि मरण्यास भाग पाडू,' अशा गंभीर धमक्या दिल्या जात होत्या.
३ डिसेंबर २०२५ च्या रात्री सुमारे १० वाजता मनीषाच्या मुलाने फोन करून आजी आजोबांना सांगितलं की, घरात पुन्हा वाद झाला असून आईला मारहाण केली जात आहे. काही वेळाने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता, मनीषा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सन २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत मनीषाला सातत्याने झालेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. वाघोली पोलिसांनी याप्रकरणी पती रामचंद्र बुरटे (वय ३५) आणि सासू सुमती बुरटे यांच्यावर भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांनुसार (हुंडा छळ आणि आत्महत्येला प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल केला आहे.
