एका 'क्लिक'ने घातला घात
वाघोलीतील बाएफ (BAIF) रस्ता परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला इन्स्टाग्रामवर शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात एक आकर्षक जाहिरात दिसली. "शेअर बाजारात गुंतवणूक करा आणि २०० टक्के फायदा मिळवा," अशा आशयाची ही जाहिरात होती. फायद्याच्या मोहापायी तरुणाने त्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यानंतर त्याला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले, जिथे त्याला गुंतवणुकीचे खोटे आकडे दाखवून विश्वास संपादन करण्यात आला.
advertisement
अशी झाली फसवणूक
सुरुवातीला कमी पैसे गुंतवण्यास सांगून सायबर चोरट्यांनी तरुणाची नोंदणी केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. तरुणाने कर्ज काढून आणि स्वतःची साठवलेली पुंजी असे एकूण ६० लाख ९० हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांवर वळते केले. मात्र, जेव्हा त्याने नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर भामट्यांचे नवे जाळे सायबर गुन्हेगार आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील जाहिरातींच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना टार्गेट करत आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
