लोणीकंद आणि शिक्रापूर परिसरातील निश्चित करण्यात आलेल्या पार्किंग ठिकाणांपासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील सहा प्रमुख ठिकाणांहून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
भीमा कोरेगावसाठी पीएमपीची मोफत बससेवा
तुळापूर फाटा, लोणीकंद येथील कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा तसेच पेरणे गाव या ठिकाणांहून 31 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत एकूण 75 मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 1 जानेवारी रोजी या मार्गांवर पहाटे चारपासून मध्यरात्री बारापर्यंत सुमारे 250 मोफत बसेस धावणार आहेत.
शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग (वक्फ बोर्ड) आणि पिंपळे जगताप–चाकण रस्ता येथून विजयस्तंभाकडे जाण्यासाठी 31 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून 140 बसेस विना तिकीट सेवा देणार आहेत. याशिवाय वढू येथील पार्किंगपासून वढू गावापर्यंत 10 मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सहा प्रमुख स्थानकांवरून लोणीकंद कुस्ती मैदानापर्यंत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी पीएमपीकडून अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत एकूण 105 बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बसेस तिकीटधारक स्वरूपात धावणार असून, पुणे स्टेशन, मनपा भवन, दापोडी येथील मंत्री निकेतन, ढोले पाटील रस्त्यावरील मनपा शाळा, अप्पर डेपो बस स्थानक तसेच पिंपरीतील आंबेडकर चौक येथून त्या सोडण्यात येतील.






