रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण आवश्यक असते. आरक्षण पूर्ण झाल्यानंतरही ज्यांना तातडीने प्रवास करायचा असतो, अशांसाठी रेल्वे निघण्याच्या एक दिवस आधी तत्काळ तिकिटाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र अलीकडच्या काळात विविध खासगी वेबसाइट्स, ऑनलाइन अॅप्स आणि दलाल तत्काळ सेवा सुरू होताच मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करून ठेवतात. नंतर ही तिकिटे अधिक दराने विकून प्रवाशांची फसवणूक केल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.
advertisement
Konkan Railway: कोकण रेल्वेचं महत्त्वाचं अपडेट, सहा दिवस वेळापत्रकात बदल, कारण काय?
तत्काळ तिकिटासाठी ओटीपी आवश्यक
या पार्श्वभूमीवर तत्काळ तिकीट हे गरज असलेल्या प्रवाशालाच मिळावे, यासाठी रेल्वेने ओटीपीची अट लागू केली आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर, अधिकृत मोबाईल अॅपवर, तिकीट खिडकीत किंवा अधिकृत एजंटकडून नोंदणी करताना प्रवाशाने स्वतःचा मोबाईल क्रमांक देणे आता आवश्यक ठरणार आहे. त्या मोबाईलवर मिळणारा ओटीपी टाकल्याशिवाय तत्काळ तिकीट बुक करता येणार नाही. या नियमाची सुरुवात मध्य रेल्वे मंडळातील स्थानकांवरून धावणाऱ्या 15 गाड्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे, मुंबईचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली की, प्रवास आरक्षणासाठी प्रवाशांनी स्वतःचा मोबाईल क्रमांकच नोंदवणे आवश्यक आहे. तत्काळ तिकीट घेताना मोबाईल क्रमांक अचूक भरला नाही, तर ओटीपी येणार नाही आणि तिकीट प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही. दलालांकडून होणारी फसवणूक रोखणे आणि तातडीची सुविधा खऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचावी, यासाठीच रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय लागू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






