नेमकी घटना काय?
आरोपी सचिन कांबळे हा कृषी विभागात कार्यरत होता, मात्र सध्या तो निलंबित आहे. २ जानेवारी रोजी त्याने कार्यालयीन वेळेत कृषी उपविभागीय कार्यालयात येऊन खिडकीची काच फोडली होती. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच कारवाईचा राग मनात धरून, आरोपीने शासकीय सुटीचा दिवस साधून पुन्हा एकदा कार्यालयावर हल्ला केला.
advertisement
कोयत्याने तोडफोड आणि नुकसान: कोणीही नसल्याची संधी साधून सचिन कांबळे याने हातात कोयता घेऊन कृषी उपविभागीय कार्यालय आणि प्रशिक्षण हॉलच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. एवढ्यावरच न थांबता, त्याने कार्यालयाबाहेरील पाण्याच्या पाईपलाईनचेही नुकसान केले. शासकीय कार्यालयात शिरून अशा प्रकारे तोडफोड केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शासकीय कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आरोपीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, निलंबित कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पुण्यात निलंबनाच्या रागातून सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला
पुण्यातूनही एक अशीच घटना समोर आली होती. यात पुणे शहरात एका सरकारी अधिकाऱ्यावर निलंबनाच्या रागातून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वी केलेल्या प्रशासकीय कारवाईचा सूड उगवण्यासाठी एका निलंबित कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह मिळून पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकास भररस्त्यात बेदम मारहाण केली.
