महामार्गांवर गाड्या मोठ्या वेगाने धावत असल्याने एखादी गाडी थांबली तरी मदतीसाठी कोणी येत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरटे प्रवाशांवर हल्ला करतात. अनेकदा हे चोरटे दुचाकीवरून येऊन वाहनचालकाला ‘गाडीच्या टायरमधून हवा निघाली आहे’ किंवा ‘पंक्चर झाले आहे’ असे सांगतात. प्रवासी गाडी बाजूला घेत थांबवतात आणि याच क्षणी चोरटे जवळ येऊन चाकू किंवा इतर शस्त्र दाखवून रोकड, मोबाईल, दागिने किंवा मौल्यवान वस्तू लुटतात.
advertisement
सासू-सून नव्हे, माय-लेकीचं नातं! आईच्या निधनाचा धक्का! सुनेनेही सोडले प्राण
लोणावळ्याजवळ लुटले
अशाच प्रकारची घटना काही महिन्यांपूर्वी लोणावळ्याजवळ घडली होती. एका पेट्रोलपंपाजवळ थांबलेल्या कारमधील लोकांना दरोडेखोरांच्या टोळीने लुटले होते. त्याचप्रमाणे इतर महामार्गांवरही रात्रीच्या वेळी थांबलेल्या गाड्यांवर हल्ले झाले असल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे.
पोलिसांच्या सूचना
पोलिसांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शक्यतो रात्रीचा प्रवास एकट्याने करू नये. प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. जर कोणी गाडी थांबवण्याचा सल्ला दिला, तर तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवू नका. काही अंतर पुढे जाऊन पेट्रोलपंप, हॉटेल किंवा वर्दळीच्या ठिकाणी वाहन थांबवून खात्री करून घ्या.
ही काळजी घ्याच!
याशिवाय प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी करणेही अत्यावश्यक आहे. टायरमध्ये हवा योग्य आहे का, पेट्रोल पुरेसे आहे का, काच व्यवस्थित आहेत का, हे पाहावे. अनोळखी किंवा निर्जन स्थळी गाडी थांबवू नका. जर एखादी संशयास्पद व्यक्ती पाठलाग करत असल्याचा संशय आला, तर तात्काळ पोलीस हेल्पलाईन किंवा जवळच्या टोल नाक्यावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी.
गेल्या काही काळात महामार्गांवरील या नव्या लुटीच्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून गस्त वाढविण्याचे आणि सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी प्रवासादरम्यान सतर्कता राखणे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीबाबत त्वरित पोलिसांना कळवणे हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम उपाय असल्याचे पोलिसांनी सांगितले.






