Chhatrapati Sambhaji Nagar: सासू-सून नव्हे, माय-लेकीचं नातं! आईच्या निधनाचा धक्का! सुनेनेही सोडले प्राण
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Sasu Sun Death : सासूच्या निधनाची दुःखद बातमी ऐकताच सुनेनेही हृदयविकाराने प्राण सोडले. सासू-सुनेचं नातं जणू मायलेकीसारखं असायचं त्यामुळे या दुहेरी मृत्यूने छत्रपती संभाजीनगर शहर हादरलं आणि सर्वत्र शोककळा पसरली.
छत्रपती संभाजीनगर : सासू–सुनेचं नातं म्हटलं की बहुतांश वेळा थोडीशी चिडचिड, किरकोळ भांडणं असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण वेदांतनगरात घडलेली ही हृदयद्रावक घटना या नात्याचं एक वेगळं, प्रेमळ आणि भावनिक रूप जगासमोर घेऊन आली आहे. सासूच्या निधनाचं दुःख सून सहन करू शकली नाही आणि काही क्षणातच तिचंही निधन झालं.
ही हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरातील वेदांतनगर भागात मंगळवारी घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आयुष्यात एकाच दिवशी आई आणि पत्नी दोघींचं निधन झाल्याने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.
रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) या शंभरीच्या उंबरठ्यावर होत्या. काही दिवसांपूर्वी त्या नाशिकला आपल्या मुलाकडे गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याची बातमी परदेशी कुटुंबाला मिळताच घरात शोककळा पसरली. हे दुःख सुन विजया परदेशी (वय 62) सहन करू शकल्या नाहीत. आईसमान सासू गेल्याच्या धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
advertisement
रुक्मिणीबाई यांच्यावर नाशिक येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तर विजया परदेशी यांच्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 05, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhaji Nagar: सासू-सून नव्हे, माय-लेकीचं नातं! आईच्या निधनाचा धक्का! सुनेनेही सोडले प्राण









