Tamhini Ghat: ताम्हिणी घाट मर्डर केसला धक्कादायक वळण; सगळे पाहतच राहिले अन् आरोपीचं पोलिसांसमोरच हादरवणारं कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या आरोपींना पुढील कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, कायदेशीर प्रक्रियेदरम्यान आरोपी अनिकेत वाघमारे याने पोलिसांना धक्का दिला आणि..
पुणे :पुणे आणि रायगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या ताम्हिणी घाट हत्याकांडातील मुख्य आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी अनिकेत महेश वाघमारे (वय २६) हा पोलीस कोठडीत असताना पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
भोसरीतील आदित्य भगत या तरुणाची हत्या करून त्याची कार चोरल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी अनिकेत वाघमारे आणि तुषार पाटोळे यांना अटक केली होती. हा गुन्हा रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, या आरोपींना पुढील कारवाईसाठी माणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, कायदेशीर प्रक्रियेदरम्यान आरोपी अनिकेत वाघमारे याने पोलिसांना धक्का दिला आणि चकवा देऊन तिथून पळ काढला.
advertisement
आरोपी फरार झाल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्रीकांत किरवले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याप्रकरणी (कलम २२४ अन्वये) नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीतून आणि पोलिसांच्या पहाऱ्यातून आरोपी फरार झाल्याने सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अनिकेत वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी आदित्य भगत याला महाबळेश्वरला फिरायला नेण्याच्या बहाण्याने ताम्हिणी घाटात नेले होते. तिथे त्याचा गळा आवळून आणि कोयत्याने वार करून खून केला आणि त्याची इनोव्हा कार चोरून ते पुण्यात विकण्यासाठी आले होते. अशा अट्टल गुन्हेगाराने पलायन केल्यामुळे पुणे आणि माणगाव पोलिसांनी आता त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
advertisement
अशी झालेली अटक - भोसरीतील आदित्य भगत याची हत्या केल्यानंतर आरोपी त्याची महागडी 'इनोव्हा क्रिस्टा' कार घेऊन पुण्यात आले होते. बाणेर पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रितम निकाळजे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची कार विकण्यासाठी ननावरे पुलाजवळ आली आहे. पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि कारचा दरवाजा उघडून आत बसत असलेल्या अनिकेत वाघमारे याला रंगेहात पकडले. अनिकेत वाघमारे याच्याकडे कारच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अवघ्या काही तासांपूर्वी ताम्हिणी घाटात मित्राचा खून करून ही कार चोरल्याची कबुली दिली. आदित्य भगत याला महाबळेश्वरला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नेऊन पैशांच्या वादातून त्याचा गळा आवळून आणि कोयत्याने वार करून खून केल्याचे त्याने मान्य केले. मात्र, आता हाच आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 7:40 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Tamhini Ghat: ताम्हिणी घाट मर्डर केसला धक्कादायक वळण; सगळे पाहतच राहिले अन् आरोपीचं पोलिसांसमोरच हादरवणारं कांड









