काय म्हणाले रोहित पवार?
गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. सुलतान मिर्झाने गुंडांमध्ये कशी मुंबई वाटली तसंच पुणे देखील या तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहे, सीपी भाजपच्या पसंतीचा, मनपा आयुक्त शिवसेना शिंदे गटाच्या पसंतीचा तर कलेक्टर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पसंतीचा अशी ही वाटणी आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुण्याचं वाटोळं केल जातंय
वरिष्ठांचा आशीर्वाद, स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन आणि गुंडांचा उपयोग ही त्रिसूत्री वापरून पुण्याचे वाटोळे केल जात आहे. असो, केवळ सत्ता आणि सत्ता हेच उद्दिष्ट असलेल्या राज्यकर्त्यांकडून दुसरी अपेक्षा तरी करायची काय? असं म्हणत रोहित पवार यांनी खरमरीत टीका केली आहे.
उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं - रोहित पवार
पुण्यात सामान्य नागरिक सोडून द्या पण पोलीसही सुरक्षित नसल्याचं वारंवार दिसून येतं. तरीही हे सरकार अजून किती गुंडांना पाठीशी घालणार आणि अशांत झालेल्या पुण्याची शांत पुणे ही ओळख पूर्ववत कधी करणार याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
गुन्हेगारांना भाजपचा पाठिंबा - रोहित पवार
दरम्यान, रोहित पवार यांनी सनसनाटी आरोप केले आहे. गुंडाच्या समर्थनात भाजपा मैदानात आहे. निलेश घायवळसारख्या गुन्हेगारांना भाजपचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात असे प्रकरण घडले असते, तर भाजप नेते आक्रमक झाले असते, पण आता ते शांत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं आहे.