पादचारी मार्गाला आपण सुरक्षित मानत असलो तरीही, हिंजवडीत फुटपाथवर चालणंही जीवावर बेतताना दिसत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंजवडी परिसरात दररोज हजारो वाहने प्रवेश करतात, त्यात मोठे कंटेनर्स, डंपर्स आणि ट्रकची संख्याही प्रचंड आहे. या वाहनांचे मनमानी फिरणे, विशेषतः पिक अवरमध्ये, अपघातांना आमंत्रण देत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रत्युष्या बोराडे यांच्या वडिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मुलीचा अपघात झाल्यानंतर त्यांनी 40 हून अधिक आंदोलने केली, परंतु ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत.
advertisement
जड वाहनांना क्लीनर असणं बंधनकारक असावं. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत आहेत. आज फुटपाथवर चालणारा व्यक्ती देखील सुरक्षित नाही. हा रस्ते व्यवस्थापनातील खूण आहे, अशी कठोर प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की तक्रारी, अर्ज, बैठका सगळं होतं, पण कृती मात्र शून्य. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, माझा तीन वर्षांचा मुलगा आहे. रोज चिंता लागलेली असते. प्रशासन फक्त आश्वासन देतं, पण प्रत्यक्षात रस्ते तसेच खड्ड्यांनी भरलेले. उपाययोजना असूनही अपघात कसे होत आहेत हा मोठा प्रश्न आहे.
हिंजवडीचा विकास हा मुख्यत्वे आयटी पार्कमुळे झाला पण आता त्याच आयटी क्षेत्रातील लोकं या परिस्थितीमुळे त्रस्त झाले आहेत. 2020 पासून स्वतःची आयटी कंपनी चालवणाऱ्या एका उद्योजकाने सांगितले. रस्त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर योग्य पद्धतीने होत नाही. खड्डे, धूळ, तात्पुरते रस्ते, अवजड वाहने यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ जातो, कंपनीला आर्थिक तोटा होतो. एवढा टॅक्स भरूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्या परिसर सोडत आहेत. हिंजवडीची जी क्रेझ होती, ती कमी होत चालली आहे.
कॉलेजला जाणारे विद्यार्थीही या वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त आहेत. कामावर किंवा कॉलेजमध्ये पोहोचणं म्हणजे एखादा मोठा टास्क झालाय. सुखरूप पोहोचणं हेच आता मुख्य उद्दिष्ट बनलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
- प्रशासनाकडे अपेक्षा – ठोस उपाय योजना कराव्या.
- अवजड वाहनांसाठी वेगवेगळे टाइम स्लॉट ठरवावेत.
- रिअल-टाइम ट्रॅफिक मॉनिटरींग वाढवावे.
- पादचारी मार्गांची योग्य दुरुस्ती करावी.
- कामे नियोजित पद्धतीने आणि गुणवत्तापूर्ण करावीत.
हिंजवडीतील नागरी समस्या आता सामान्य राहिलेल्या नाहीत. दररोजचा प्रवास हा जीव मुठीत धरून करण्यासारखा झाल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. प्रशासनाने तात्काळ आणि दीर्घकालीन उपाय न केल्यास हिंजवडीतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.