दरोड्याचा थरार: मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१६ जानेवारी) पहाटे तीनच्या सुमारास ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी प्रमोद बबन सुक्रे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी थेट वृद्ध आजोबा बबन दशरथ सुक्रे यांना गाठले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवत "पैसे आणि सोने दे" अशी धमकी दिली. एका नराधम चोरट्याने आजोबांच्या पाठीवर कोयत्याचा उलट वार करून त्यांना कानाखालीही मारली. या मारहाणीमुळे सुक्रे आजोबांनी घाबरून आपल्याकडील १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांच्या हवाली केली.
advertisement
घरातील गोंधळ ऐकून प्रमोद सुक्रे यांच्या पत्नी काजल सुक्रे मदतीसाठी धावल्या. मात्र, निर्दयी चोरट्यांनी त्यांनाही धमकावून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि घरातील इतर ऐवज असा सुमारे ३ तोळे सोन्याचा साठा हिसकावून घेतला. चोरट्यांनी यावेळी घरातील मोबाईलही चोरला. या घरावर दरोडा टाकल्यानंतर चोरट्यांनी शेजारील इतर दोन घरांमध्येही चोरीचा प्रयत्न केला, परंतु तिथे नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. ग्रामीण भागात वाढत्या सशस्त्र चोऱ्यांमुळे ग्रामस्थांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
