पुणे : छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा गौरवशाली इतिहास आज आपण त्या काळातील गड किल्ले, कागद पत्रे आणि शस्त्रांच्या रूपाने जगत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपितील दुर्मिळ पत्र ही पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी आहेत. याठिकाणी 25 लाख मोडी लिपतील दुर्मिळ तसेच पर्शियन कागदपत्रे आहेत.
advertisement
ऐतिहासिक कागदपत्रे केली जमा
7 जुलै 1910 या दिवशी इतिहासाचार्य बी. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. शास्त्रोक्त पद्धतीने मराठ्यांचा इतिहास जगासमोर यावा हा ध्येयाने या मंडळाची स्थापना करण्यात आली. शेकडो इतिहास संशोधकांनी देशभर प्रवास करून अनेक ऐतिहासिक घराणी, वतनदार, यांच्या संस्थानांना, घरांना भेटी देऊन त्यांच्याजवळील ऐतिहासिक कागदपत्रे याठिकाणी जमा केली आहेत.
Shiv Jayanti : महिला शाहिरांचा डफ घुमतोय मराठी मुलाखत; पोवाड्यातून करतायेत समाजप्रबोधन Video
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे यांसह सर्व छत्रपतींची मोडी लिपीतील मूळ पत्रं याठिकाणी आहेत. सर्वाधिक पत्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची याठिकाणी आहेत. दुर्मिळ अशी मुघल बादशहा यांची फर्मानं, ताम्रपट, नाणी, शस्त्रे त्याचबरोबर तब्बल 42 हजार हातानी लिहलेल्या पोथ्या ऐतिहासिक व्यक्तींची चित्रं याठिकाणी पाहायला मिळतील, अशी माहिती विभागाच्या अध्यक्षा बी. कुलकर्णी यांनी दिली आहे.
याठिकाणी असलेल्या ग्रंथालयात 52 हजार इतिहासावरील पुस्तके आहेत तसेच वेगवेगळ्या भाषेतील दुर्मिळ ग्रंथ देखील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेल्या व्यक्तीने लिहलेल्या ग्रंथात शिवरायांचं वर्णन केलं आहे. 1686 मध्ये तो ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला त्या ग्रंथाची अस्सल प्रतदेखील याठिकाणी आहे. माँसाहेब जिजाऊंचे अत्यंत दुर्मिळ असं आजपर्यंत सापडलेलं एकमेव पत्रदेखील याठिकाणी आहे. ज्यावर त्यांचा शिक्का देखील आहे. इतिहासाची साक्ष देणारी अनेक कागदपत्रे याठिकाणी आहेत. पुण्यात आल्यावर या ठिकाणी आवर्जून भेट देऊन तुम्ही हे सर्व पाहू शकता.