Central Railway: मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! पुणे ते नागपूर विशेष रेल्वे धावणार, पाहा वेळापत्रक
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Central Railway: विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे : प्रवाशांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांचा विचार करत मध्य रेल्वेने पुणे–नागपूर मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या मार्गांवर एकूण 24 विशेष गाड्या धावणार असून, त्यापैकी पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. यामुळे विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर विशेष गाडी (क्रमांक 01467) 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.50 वाजता पुणे स्थानकावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे नागपूर ते पुणे विशेष गाडी (क्रमांक 01468) 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून निघून रात्री 11.30 वाजता पुण्यात दाखल होईल.
advertisement
याशिवाय पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट गाडीच्या आणखी दोन विशेष फेऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे ते नागपूर सुपरफास्ट गाडी (क्रमांक 01419) 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.50 वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. तर नागपूर ते पुणे सुपरफास्ट गाडी (क्रमांक 01420) 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून निघून त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुण्यात येईल.
advertisement
या विशेष गाड्यांमुळे सण-उत्सव, परीक्षा, कौटुंबिक कारणे तसेच व्यावसायिक कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. सध्या पुणे–नागपूर मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढलेली असून, आरक्षित तिकिटांची उपलब्धता कमी होत असल्याने विशेष गाड्यांची मागणी सातत्याने केली जात होती.
या सर्व विशेष रेल्वेगाड्यांसाठी तिकीट आरक्षणाची सुविधा रेल्वेच्या अधिकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांनी वेळापत्रक व थांबे यांची माहिती तपासून तिकिटे आरक्षित करण्याचे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 9:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Central Railway: मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! पुणे ते नागपूर विशेष रेल्वे धावणार, पाहा वेळापत्रक










