पिंपरी: उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. कोयत्या गँगने शहर भरात धुडगूस घातला आहे. अशातच चिंचवड भागात कोयत्या गँगच्या दहशतीचा चेहरा समोर आला आहे. एका टोळक्याने कोयत्याने एका टाइल्स विक्रेत्या दुकानदारावर हल्ला केला आणि ३ लाख रुपये लुटले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
मिळालेल्याा माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील लिंक रोड चिंचवड भागामध्ये 2 डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या भागात राहणाऱ्या एका टाईल्स फरशीच्या दुकान मालकावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आला आहे.
चिंचवड भागात टाइल्स फरशी विक्रेता दुकनादार नेहमी प्रमाणे रात्री दुकानं बंद करून घरी निघाला होते. दुकानाबाहेर येऊन आपल्या स्कुटरजवळ थांबले. त्यावेळी अचानक दबा धरून बसलेलं टोळकं धावून आलं आणि दुकानदारावर थेट कोयत्याने हल्ला चढवला.
दबा धरून बसलेल्या टोळक्याने या दुकानदाराला लक्ष करत त्यांना कोयत्याने मारहाण केली आणि हातातील बॅग हिसकावून घेतली. बॅगेमध्ये त्यांच्या कडील 3 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेमुळे चिंचवड परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
दुकानदाराने या घटनेनंतर चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडलेली सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून घेतला आणि या घटनेचे गांभीर्य ओळखून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या तिघांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
