पुणे : पुण्यात वाहन तोडफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शहरातील नऱ्हे गाव परिसरात JSPM कॉलेजजवळ पुन्हा एकदा तीन जणांनी दुचाकीवर येत चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात स्पष्ट कैद झाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू केला आहे.
advertisement
ही घटना सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात उभ्या असलेल्या काही चारचाकी वाहनांना लक्ष्य करत तिघेही दुचाकीवर आले होते. हातात लोखंडी रॉड आणि दगड असून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. या अचानक झालेल्या तोडफोडीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
CCTV फुटेज ताब्यात
CCTV फुटेजमध्ये आरोपी हेल्मेट घालून किंवा चेहरा झाकून आलेले दिसत नाही. दुचाकीवर मागून आलेल्या या तिघांनी कॉलेज परिसरातील वाहने काही क्षणांतच उद्ध्वस्त केली. घटनेनंतर ते लगेचच दुचाकीवरून पळून गेले. गाडीवर उतरताना तिघांपैकी एक जण दुसऱ्याला अडवत होता, मात्र तो ऐकायला तयार नव्हता. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
वाहनमालकांची मोठ्या प्रमाणावर हानी
दरम्यान, या परिसरात मागील काही महिन्यांपासून चोरी, तोडफोड, गाड्यांची हानी अशा घटना वाढल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांचा परिसर असल्याने विद्यार्थ्यांची मोठी ये-जा असते. त्यामुळे अशी तोडफोड सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा तपास सुरू आहे. वाहनमालकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने नागरिकांनी परिसरात गस्त वाढवावी, तसेच सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे.
कठोर कारवाईची मागणी
पुण्यात वाढत्या वाहनतोडफोडीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमता आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुण्यातील गुन्हेगारी आता राज्यात चर्चेचा विषय
पुण्यातील गुन्हेगारी आता राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ड्रग्जची तस्करी, कोयता गँगची दहशत ते दिवसाढवळ्या हत्यांच्या सत्रामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. यातून एक धक्कादायक वास्तवही समोर आलंय. अनेक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले असल्याचं तपासातून समोर आलंय.
