तब्बल ११ महिन्यांत ६० लाखांचे व्याज!
महादेव विठ्ठल जरांडे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी आनंता पवार आणि माऊली पवार यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केली होती. मात्र, त्यासाठी दरमहा ८ ते १० टक्के या अवाजवी दराने व्याजाची मागणी सुरू केली. जरांडे यांनी ५३ लाख ८९ हजार रुपयांच्या मुदलावर अवघ्या ११ महिन्यांत ६० लाख ४१ हजार रुपये व्याज भरले. तरीही आरोपींची हाव कमी झाली नाही. त्यांनी विक्रीसाठी असलेल्या जरांडे यांच्या १२ गाड्याही जबरदस्तीने ओढून नेल्या.
advertisement
बंदुकीचा धाक
डिसेंबर २०२५ मध्ये आरोपींनी जरांडे यांचे अपहरण करून त्यांना कुंजीरवाडी येथे नेले. तिथे बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या मालकीची कोरेगाव मूळ येथील ३ गुंठे जमीन आरोपींच्या नातेवाईकाच्या नावावर करून घेतली. या व्यवहाराचा कोणताही मोबदला जरांडे यांना देण्यात आला नाही. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर २६ जानेवारी रोजी महादेव जरांडे यांनी विषारी औषध प्राशन केले.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
पीडित व्यावसायिकाच्या पत्नीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. २९ डिसेंबर रोजीच याप्रकरणी तक्रार अर्ज दिला होता, मात्र पोलिसांनी वेळेवर कारवाई केली नाही. "जर वेळीच कठोर पावले उचलली असती, तर माझ्या पतीवर ही वेळ आली नसती," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सध्या आरोपी आनंता पवार, माऊली पवार, दीपाली साळुंखे आणि विजय गोते यांच्यावर गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
