पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना म्हाडा कॉलनीतील एका सदनिकेत छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालवले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
तपासात अशी माहिती समोर आली आहे की, आरोपी बाहेर उघडपणे हुक्का पार्लर चालवण्याची हिंमत करत नव्हते. त्यामुळे पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी त्यांनी घरातच सुरक्षित ठिकाण म्हणून हुक्का पार्लर थाटले होते. विशेष म्हणजे, आरोपी ग्राहक मागतील त्याप्रमाणे ऑनलाइन मागणीनुसार हुक्का पुरवत होते. पोलीस कर्मचारी हरिप्रसाद पुंडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.
दरम्यान, मुंबईतील कमला मिल परिसरातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेची दखल घेऊन राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे.
