सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला आहे. कार्यक्रमाच्या स्थळीच हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नुकतेच झालेले आहे. काही लोकांनी एकत्र येऊन हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अशातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
advertisement
हल्ला कसा झाला?
कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी स्वत: घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ''मी प्रकाशन कट्ट्यावर पुस्तकांचे प्रकाशन करून बाहेर पडत होतो. माझ्या डोळ्यात केमिकल सारखे काहीतरी टाकण्यात आले.तुला संपवतो अशी भाषा वापरण्यात आली. मी त्याच्यातून बचावलो. मात्र माझ्या जीव गेला तरी चालेल भाषेची आणि साहित्याची सेवा मी शेवट पर्यंत करत राहील''. असं त्यांनी म्हंटले आहे.
सातारा शहरात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून नामवंत साहित्यिक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र, या संमेलनाचे वैशिष्ट्य केवळ उपस्थितीपुरते मर्यादित नसून, अनेक अनोखे पैलू यानिमित्ताने अनुभवता येणार आहेत. या संमेलनाची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या साताऱ्यात तब्बल पाच दिवस मुक्काम करणार आहेत. त्यांच्या दीर्घ उपस्थितीमुळे विविध वैचारिक चर्चा, संवाद आणि साहित्यविषयक उपक्रमांना विशेष उंची मिळणार आहे.
याशिवाय, या संमेलनात तब्बल नऊ माजी संमेलनाध्यक्ष सलग चार दिवस सहभागी होणार आहेत. हे सर्व माजी अध्यक्ष एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याने साहित्यविश्वात हा प्रसंग ऐतिहासिक मानला जात आहे. यापूर्वी झालेल्या कोणत्याही साहित्य संमेलनात इतक्या मोठ्या संख्येने माजी अध्यक्षांची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे साताऱ्यातील हे साहित्य संमेलन केवळ आयोजनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर परंपरा आणि वैचारिक समृद्धीच्या अंगानेही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
माजी अध्यक्ष राहणार उपस्थित
या संमेलनात उपस्थित राहणाऱ्या माजी अध्यक्षांमध्ये २०२५ मधील दिल्ली येथील संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, २०२४ अमळनेर येथील डॉ. रवींद्र शोभणे, २०२२ उदगीर येथील भारत सासणे, २०१९ यवतमाळ येथील डॉ. अरुणा ढेरे, २०१८ बडोदा (गुजरात) येथील लक्ष्मीकांत देशमुख, २०१७ डोंबिवली येथील अक्षयकुमार काळे, २०१६ पिंपरी-चिंचवड येथील श्रीपाल सबनीस, २०१५ घुमान (पंजाब) येथील सदानंद मोरे, २०१४ सासवड येथील फ. मुं. शिंदे आणि २०१० ठाणे येथील उत्तम कांबळे यांचा समावेश आहे.
