अशी झाली कारवाई: १३ जानेवारी रोजी वाघोली पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी वाघोली ते केसनंद रस्त्यावरून एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीतून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तातडीने सापळा रचला आणि संशयास्पद वाहन अडवून त्याची झडती घेतली.
advertisement
या झडतीदरम्यान पोलिसांना गाडीत विदेशी दारूच्या तब्बल ७ हजार ४४१ बाटल्या आढळल्या, ज्यांची बाजारपेठेत किंमत १६ लाख ७६ हजार ८४५ रुपये आहे. यासोबतच दारू वाहून नेण्यासाठी वापरलेली ७ लाख रुपये किमतीची पिकअप गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
चालकावर गुन्हा दाखल: याप्रकरणी पोलिसांनी कपिल दिगंबर शाहू (वय २६, रा. केसनंद, मूळ रा. मुखेड, जि. नांदेड) या चालकाला जागीच ताब्यात घेतले आहे. निवडणुकांच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी किंवा अवैध विक्रीसाठी हा मोठा साठा नेला जात होता का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.
