933 कोटी रुपयांची थकबाकी
पुणे महानगरपालिका दर महिन्याला केवळ दहा कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यातच जलसंपदा विभागाने 953 कोटी रुपयांची नोटीस बजावली होती. पुणे महानगरपालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर कोट्यापेक्षा 8.84 टीएमसी अधिक पाणी वापरले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या नियमांनुसार मंजूर मर्यादेपेक्षा 25 टक्क्यांपर्यंत जादा वापर झाल्यास दीडपट दराने आकारणी केली जाते, तर त्यापेक्षा अधिक वापर झाल्यास पाणी दराच्या तिप्पट दंडाची तरतूद आहे. त्यामुळे थकबाकीचा प्रश्न लवकर निकाली न लागल्यास पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
पालिका महिन्याला फक्त 10 कोटी रुपयेच भरते
पुणे महानगरपालिकेकडून 2016 पासून अतिरिक्त पाणीवापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नियमांनुसार आकारणी केली आहे. महापालिकेकडे 952 कोटी 62 लाख रुपयांची थकबाकी होती. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 19 कोटी 75 लाख रुपये भरल्यानंतरही फेब्रुवारीअखेर 932 कोटी 88 लाख रुपये बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. महिन्याला फक्त 10 कोटी रुपयेच जमा होत आहेत. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 31 जानेवारीअखेर महापालिकेने 11.23 टीएमसी पाणीवापर केला असून उर्वरित 0.36 टीएमसी पाणी पुढील 12 दिवसांत वापरले जाण्याची शक्यता आहे.
खडकवासला प्रकल्प अंतर्गत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिका मंजूर कोट्यापेक्षा जादा पाणी वापरत आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठी पाणी कमी पडत असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी वाढली आहे. महापालिकेने तातडीने थकबाकी भरावी, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






