देवघर : काहीच दिवसात देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. या दिवशी कृष्णाची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख-समृद्धीचं आगमन होतं आणि बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याला गोड बातमी मिळते असं म्हणतात. देवी-देवतांच्या पूजेत नैवेद्य अर्पण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. नैवेद्याच्या ताटात त्यांचे प्रिय पदार्थ वाढले जातात. त्यामुळे देव प्रसन्न होतात आणि आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते, असं म्हणतात. दरम्यान, भगवान श्रीकृष्णाच्या नैवेद्यात नेमके कोणते पदार्थ असायला हवे? याबाबत ज्योतिषांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय सांगतात ज्योतिषी?
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते. यंदा हा सण 26 ऑगस्टला, सोमवारी साजरा होईल. सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो आणि श्रावण महिना त्यांनाच समर्पित असतो. म्हणून श्रावणी सोमवार हे सणवारापेक्षा कमी नसतात आणि याच दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी होणं हा अत्यंत सुवर्ण योग आहे.
कृष्णाचा आवडता पदार्थ कोणता?
ज्योतिषांनी सांगितलं, नैवेद्य अर्पण केल्यानं भगवान कृष्ण प्रसन्न होतात. पौराणिक कथांमध्ये लिहिलंय, कृष्ण चोरून चोरून दही खायचा म्हणूनच त्याला प्रेमानं 'माखनचोर' म्हटलं जायचं. परंतु कृष्णाला केवळ दही आवडत नाही, तर त्याचं सर्वात प्रिय नैवेद्य आहे दही आणि खडीसाखर. तसंच नारळाचे लाडूसुद्धा आपण कृष्णाला अर्पण करू शकता. महत्त्वाचं म्हणजे नैवेद्यात तुळशीपत्राचा समावेश असायलाच हवा. तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यामुळे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य अपूर्ण मानतात.
दरम्यान, 26 ऑगस्टला दिवसभर उपवास पाळावा. भगवान कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला चंद्रोदयात झाला होता, त्यामुळे जन्माष्टमीच्या रात्री 11 वाजून 5 मिनिटांनंतर पूजा करून कृष्ण जन्म साजरा करावा, असं ज्योतिषांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.