मुंबई : 'नवरात्रोत्सव' म्हणजे आनंदाचा सण, या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या 9 रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तुम्हाला माहितीये का, वर्षभरात एकूण 4 नवरात्रोत्सव साजरे होतात. त्यातले 2 मोठ्या प्रमाणावर साजरे करतात, तर 2 नवरात्री गुप्त असतात. सुरुवात होते ती अगदी जानेवारी महिन्यापासूनच. अर्थात मराठी पौष महिन्यात पहिला नवरात्रोत्सव साजरा होतो.
advertisement
पौष महिन्याच्या सुरुवातीला जी नवरात्री येते तिला म्हणतात 'शाकंभरी नवरात्री'. यंदा 7 जानेवारीपासून 13 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा होईल. याबाबत गुरुजी नयनेश जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
गुरुजींनी सांगितलं की, चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर, शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमीपासून पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. यंदादेखील वर्षाच्या सुरुवातीलाच शाकंभरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होत असून पौष पौर्णिमेपर्यंत साजरा होईल.
'बनशंकरी देवी'ला अनेकजण कुलदेवता मानतात. अशी अख्यायिका आहे की, जेव्हा अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेनं प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचं पोषण केलं म्हणून तिला शाकंभरी नाव मिळालं. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनात राहणारी देवी असंही म्हणतात. तसंच या देवीची पौर्णिमाही खास मानली जाते.
शाकंभरी पौर्णिमेला चालू हंगामात पिकणाऱ्या 60 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवण्याची परंपरा आहे. हे नैवेद्य सूर्योदयापूर्वी दाखवतात. राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये देवीला हे नैवेद्य अर्पण केलं जातं. देवी भागवत पुराणांमध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार, एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे अन्नपाणी न मिळाल्यानं लोक तडफडून प्राण सोडू लागले. देवीला ही परिस्थिती पाहावली नाही, तिला दया आली. त्यावेळी तिनं आपल्या शरीरातून तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. त्या प्रेमानं खाऊ घालून देवीनं लोकांचे प्राण वाचवले. तेव्हापासून वर्षाच्या सुरुवातीला शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते.
गुरुजी सांगतात की, या नवरात्रीची स्थापना अशी करावी की, सुरुवातीला दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शाकंभरी देवीचं स्मरण करावं. नंतर हळद, कुंकू, अक्षदा, सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या. शाकंभरी देवी ही वनस्पतींची देवता मानली जाते. त्यामुळे पूजेत ताजी फळं आणि भाज्या अर्पण कराव्या. तसंच स्थापना सायंकाळी 4.24 वाजता करावी. नीलवर्णानीलोत्पलविलोचना। मुष्टिंशिलीमुखापूर्णकमलंकमलालया।। हा शाकंभरी देवीचा मंत्रजप करणं लाभदायी ठरू शकतं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.