गुढी उभारण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम दिशा
वास्तूशास्त्रानुसार, गुढी उभारण्यासाठी घराची पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्याची आणि ऊर्जेची दिशा आहे. सूर्याची पहिली किरणे गुढीवर पडल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जर तुम्हाला पूर्व दिशेला जागा नसेल, तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यातही गुढी उभारू शकता. ईशान्य कोपरा हा ईश्वराचा मानला जातो, ज्यामुळे घरातील सुख-शांती कायम राहते.
advertisement
चुकीच्या दिशेचे परिणाम
गुढी कधीही घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला उभारू नये. दक्षिण दिशा ही यमाची आणि पितरांची मानली जाते. या दिशेला विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढू शकते किंवा आर्थिक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. गुढी नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागी उभारावी. जिथे कचरा किंवा चपलांचे स्थान असेल, तिथे गुढी उभारणे टाळावे.
गुढी उभारताना 'या' वास्तू टिप्स पाळा
गुढी उभारताना काही गोष्टींचे भान ठेवल्यास घरामध्ये वर्षभर भरभराट होते.
उंची: गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने उंच जागी आणि किंचित बाहेरच्या दिशेला झुकलेली असावी.
रांगोळी आणि तोरण: गुढीच्या खाली जमिनीवर सुंदर रांगोळी काढा आणि मुख्य दरवाजाला आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावा. यामुळे घराची संरक्षण शक्ती वाढते.
साहित्य: तांब्याचा कलश पालथा घालताना त्यावर कुंकवाने 'स्वस्तिक' नक्की काढा. स्वस्तिक हे सर्व अडथळे दूर करणारे चिन्ह आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
