धाराशिव : आपला भारत देश विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींनी नटलेला आहे. विविधतेतली एकता इथं अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळते. काही सण-उत्सव सर्वधर्मीय एकत्र येऊन साजरे करतात. विशेष म्हणजे काही धार्मिक स्थळं अशीही आहेत जिथं हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र दर्शन घेतात.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात जवळा निजाम याठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरत निजामोद्दीन बाबा यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः आषाढ महिन्यात इथं हिंदू-मुस्लिम भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. हिंदू बांधव इथं ज्वारीची भाकरी आणि बेसन वडीचा नैवेद्य मोठ्या श्रद्धेनं अर्पण करतात.
advertisement
हेही वाचा : अद्भुत! सातारच्या शिव मंदिराची जगात ख्याती, चक्क दुभागी शिवलिंगाचं होतं दर्शन
हजरत निजामोद्दीन बाबांच्या नावावरूनच या गावाला 'जवळा निजाम' नाव पडलं. गावात कोणतंही शुभकार्य असेल तर त्यापूर्वी नागरिक बाबांचं दर्शन घेतात. मग नव्या गाडीची पूजा असो किंवा लग्न असो, नारळ सर्वात आधी निजामोद्दीन बाबांच्या चरणी अर्पण केला जातो.
हिंदू पद्धतीनं विवाह संपन्न झाल्यानंतरही वधू-वर निजामोद्दीन बाबांच्या दर्ग्यात दर्शनासाठी येतात आणि निकाहच्या आधीसुद्धा दुवा मागण्यासाठी बाबांच्या चरणी मुस्लिमधर्मीय नतमस्तक होतात. जवळा निजाम गावचं जागृत ग्रामदैवत म्हणून निजामोद्दीन बाबांना ओळखलं जातं. खरंतर निजामोद्दीन बाबांच्या दर्शनासाठी नेहमीच लोकांची मोठी गर्दी असते, असं भाविक वसीम काजलेकर यांनी सांगितलं. दरम्यान, दर्गा परिसरात एक मोठी ऐतिहासिक बारवसुद्धा आहे.